Sunday, July 28, 2013

Marathi Kavita : हे शहर काळोखात बुडत असते ...!!

कसे हे गाव
हे शहर
काळोखात बुडत असते
मी बघत बसतोय ह्यांचे
काळोखात बुडणे
हलके हलके विरघळून जाणे
रात्रीचे दहा वाजून गेलेले
तरी कसा प्रकाश होता
संध्याकाळचा मंद मंद प्रकाश
सगळीकडे झिरपत होता
हवा अशी मस्त होती
थंड थंड नि निव्ब्वळ थंड होती
वाटत होते
रात्र आता होणारच नाही
काळोख होऊन
गाव काळोखात बुडणारच नाही
तरीही हे गाव काळोखात बुडत होते
हे खरेच जाणवत होते
संध्याकाळच्या संधी प्रकाशाला
काळोख हलके हलके आवळीत होता
प्रकाशाचे केविलवानेपण जाणवत होते
नि हे गाव
हलके हलके काळोखात बुडत होते

रस्त्यावरचे लाल ,हिरवे सिग्नल
निराळ्याच रंगाचे भासत होते
रस्ते सुन्न होते
शुकशुकाट होता सर्वत्र
हे परदेशात असेच होते
ह्या बर्फाळ हवेत रात्र अलगद उतरत असते
हे गाव ,हे शहर काळोखात बुडत असते

ही रेल्वे लाईन
लांबलचक पसरलेले रूळ
त्यांचे रंगीत सिग्नल
लाल ,हिरवे ,पिवळे
प्रकाशाचे टिंब
धुक्यात विरघळत होते
काळोखात बुडता बुडता
मी आहे म्हणत होते
ईतकेच काय ते
बाकी गाव काळोखात बुडत होते

ही गच्च झाडी
हिरवी हिरवी गच्च पाने
कशी काळोख होत होती
झाडापानातून काळोख सांडत होता
बुंध्याशी काळोखाचे गच्च थारोळे
साठलेले बघत होता ..
हलकेहलके हा काळोख
झिरपत झिरपत पसरणार आहे
नि हे गाव काळोखात बुडणार आहे
मी बघत बसतोय ह्यांचे
काळोखात बुडणे

No comments: