Sunday, July 28, 2013

Marathi Kavita : झाडे वाट बघत बसतात ...!!

मी बघतोय ह्या देशातील सूर्य
बर्फात गुंडाळून ठेवलेला
शुभ्र वाटतोय खुपसा
पण तोंडावर बोट
गप्प गप्प मुकामुकासा
जीव गुदमरून जातोय त्याचा
बर्फाच्या अटकेतून सुटण्याची त्याची धडपड
चिंब थंड होऊन निसटतात त्याची किरणे
बाहेर निसटले की तेही गारठून जातात
लंगडत लंगडत खुरडत
हलकेच झाडावर रेंगाळत बसतात
शुभ्र बर्फ झाडांच्या काष्ठ शिल्पावर
पिवळ्या उन्हाचा तुकडा
हलकासा स्पर्श
नुसता कोरडा
निर्जीव
केविलवाणा...!!

झाडे मिटल्या डोळ्यांनी घेत राहतात त्याचा स्पर्श
कधीतरी पेटून उठेल
नि त्याचा उष्ण श्वास
अंगा-अंगावर झुलेल
नि पालवी फुटेल हिरव्या स्वप्नाची
झाडे शांत
क्लांत
स्वप्ने बघत रोमाचून जातात
आपल्या हिरव्या गर्भारपणाची
मिटल्या डोळ्यांनी वाट बघत बसतात
कधी विरघळून जाऊ त्याच्या गच्च मिठीत
नि उजवेल कूस कधी..?
केव्हा ..?
झाडे वाट बघत बसतात
त्याच्या सळसळण्याची
त्यासाठी ती शांत
ध्यानमग्न
आतुर होऊन जातात
आत्मसमरपणासाठी .......!!

No comments: