Tuesday, March 24, 2015

विरह यातना | Virah Kavita in Marathi | Hurt Marathi Poems | Sad Broken Heart Kavita in Marathi Font

नाही विसरू शकणार कधी
तुला अन तुझ्या आठवणींना
नाही मिटवू शकणार कधी
हृदयात जपलेल्या साठवणींना
हरवलीय तुजवीन जगण्याची चेतना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।ध्रु.।।

न सांगता सोडून गेलीस
अशी अचानक पाठ फिरवलीस
जीव माझा ठेऊन ओलीस
काय मिळाले तुज सांगना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।१.।।

नाही पाठवलीस चिठ्ठी, ना धाडलास निरोप
विसरलीय तहान भूक गमावलीय झोप
नाही पाठवलीस ई-मेल, नाही केलास फोन
तुजवीन सावरे मज दुसरे कोण
सखे, कशा पोहचवू माझ्या भावना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।२.।।

काय चूक झाली माझ्या हातून
सुकलाय कंठ बसलाय दाटून
दिलीस अश्रुंची माळ, गेलय काळीज फाटून
प्रिये कशी विसरलीस सोबतीच्या सोनेरी क्षणांना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।३.।।

स्पंदनात घुमतेय नाव तुझे
डोळ्यांत दिसती भाव तुझे
श्वासांत दरवळे गंध तुझा
हातांवर मखमली स्पर्श तुझा
मिटल्या पापण्यांवर उमटती गुलाबी घटना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।४.।।

नाही विसरू शकणार कधी
तुला अन तुझ्या आठवणींना
नाही मिटवू शकणार कधी
हृदयात जपलेल्या साठवणींना
प्राणप्रिये अधुरा आहे मी तुझ्याविना
ये लवकर नि सावर …
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।५.।।
--------------------
कवितासंग्रह: मुक्तस्पंदन
कवी: सचिन निकम 

No comments: