Wednesday, May 27, 2015

तुझ्या येण्याने | Best Prem Kavita | Long Marathi Poems in Marathi | Prem Kavita For Girlfriend/Her

मदनगंध वाऱ्यात मिसळला
प्रणयउमंग अंगात उसळला
दाटल्या कंठाला पाझर फुटला
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
नंदादीप उजळले… तुझ्या येण्याने ।। धृ . ।।

स्पंदनतरंग दरवळले
सप्तरंगांत विरघळले
आतुरलेले मन हरवळले
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
शीतल चांदणे अवतरले… तुझ्या येण्याने ।। १. ।।

उजळली कांती कांचनी
लावण्य भरती लोचणी
ऐशा एकांत क्षणी येना जवळ साजनी
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
सप्तसुर नभी विसावले… तुझ्या येण्याने ।। २. ।।

स्वप्न असे की मृगजळ हे
आभास तर नव्हे ना, कैसे मज कळे
मनचातक चिंब न्हाले पहिल्या धुंद सरीने
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
घनामृत बरसले… तुझ्या येण्याने ।। ३. ।।

ती :
मी तुझीच जाहले ज्याक्षणी तुज पाहिले
मिलनाच्या ओढीने मनिमन हरकले
घेना मिठीत सामावून आता सर्व तुज अर्पिले
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
मेंदीच्या पानावर नक्षत्र उमटले… तुझ्या येण्याने ।। ४. ।।

तो :
येणा प्रिये तू अशी जवळी माझ्या राहा
न राहील भान कसले अशी डोळ्यांत पाहा
कसे सांगू किती सौख्य मज लाभले
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
स्वप्न अंतरीचे साकारले… तुझ्या येण्याने ।। ५. ।।

कवी : सचिन निकम
कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
पुणे