Saturday, October 11, 2014

केस उपटायची वेळ आली! | Marathi Gambhir Kavita | Poems on Sad Life in Marathi

विचार त्यांनी आमचा करायचा
हे सत्य आता घटका मोजत आहे
सत्तेच्या अंदाधुंदीत लोकशाही ही
हुकूमशहांच्या लाथा झेलत आहे ....
कायापालटाची निलाजरी भाषा
कानांना हल्ली नकोशी झाली
जनतेने ऐकावे तरी काय काय
आता केस उपटायची वेळ आली!

अरे कुणावर ठेवायचा विश्वास
जो तो तंगड्या वर करतोय
स्वार्थासाठी इथे लाज सोडली
बापाचेही तो नाव बदलतोय...
किती सोसावे डोळ्यांनी या
लोकशाही त्यांनी निर्वस्र केली
झाकुन झाकुन किती झाकणार
आता केस उपटायची वेळ आली!

इथुन तिथून बरबरटलेली व्यवस्था
विषाणुच असे जहरी साप जसे
लागण चोहीकडे फोफावलेली
डंखापासुनि वाचणार कसे....?
शोधेल का रे लस कुणी इथे
लोकशाहीच आज पांगळी झाली
सगळेच उत्सुक होण्यास खांदेकरी
आता केस उपटायची वेळ आली!

मिटतो रे डोळे आम्ही हताशपणे
लाजही शरमेने आज लाजली
भाषेनेही टेकले साफ गुडघे
शब्दांनी तर साथच सोडली.....
काय म्हणावे यांना शोधतो आहे
कोशांनीच आता मान टाकली
विचार करून रागा-रागाने
आता केस उपटायची वेळ आली!
आता केस उपटायची वेळ आली!!


*अनिल सा.राऊत*

No comments: