Showing posts with label हो मूर्ख आहे मी शतमूर्ख आहे. Show all posts
Showing posts with label हो मूर्ख आहे मी शतमूर्ख आहे. Show all posts

Saturday, February 15, 2014

हो मूर्ख आहे , मी शतमूर्ख आहे | Marathi Kavita | मराठी कविता

हो मूर्ख आहे , मी शतमूर्ख आहे …
मला स्वार्थी होणे , हे जमलेचि नाही ।
साभोतली चाले जी स्पर्धा जीवांची ।
मी स्पर्धेमध्ये त्या उतरलेची नाही ।।

इथे पांघरुनी मुखवटे जगावे
कधी सत्य कोणा नसे रे स्वीकार
सुखाच्या शोधात , मने मारुनिया…
इथे असत्याला घडे नमस्कार …
अशा या जगात कसे वावरावे ।
मला बावळीला समजलेची नाही ।
साभोतली चाले जी स्पर्धा जीवांची ।
मी स्पर्धेमध्ये त्या उतरलेची नाही ।।

कसे मी बोलावे , कसे मी चालावे
किती झाकुनीया , किती दाखवावे ।
कुठे हात द्यावा , कुठे स्वार्थ व्हावा …
मला ना कळावे , इथे बारकावे …
इथे दुध प्यावे , मिटूनिया डोळे …
मला हेच सत्य ,उमगलेच नाही ।
साभोतली चाले जी स्पर्धा जीवांची ।
मी स्पर्धेमध्ये त्या उतरलेची नाही ।।

इथे नित्य बदले , जगण्याचा अर्थ ।
इथे रोज अस्तित्व , जपण्याची शर्थ ।
कुठे माया- ममता, कुठे रे जिव्हाळा ।
अता जीवनात , उरे फक्त स्वार्थ ।
जगी चालते या , धनाचीच सत्ता ।
मला तो मिळविणे, हे जमलेची नाही
साभोतली चाले जी स्पर्धा जीवांची ।
मी स्पर्धेमध्ये त्या उतरलेची नाही ।।

गमे या जगी तू , असे सर्व कोशी ।
अणु रेणू तुनी , तुझा रे निवास …
तरी संग मजला , कसा चालला हा
जगाचा विनाश कडे रे प्रवास ।
तुवा खेळवावे , नवे नित्य खेळ
मला त्याचे मर्म , उमजलेच नाही …
साभोतली चाले जी स्पर्धा जीवांची ।
मी स्पर्धेमध्ये त्या उतरलेची नाही ।।